कोल्हापूर: विशाळगडवर झालेला हिंसाचार (Vishalgad Violence) म्हणजे प्रशासनाचं अपयश आहे असं सांगत संभाजीराजेंनीही (Chhatrapati Sambhajiraje) यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली आहे. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. 


कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनंतर आता काँग्रेस नेते सतेज पाटलांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशाळगडावर झालेली घटना म्हणजे प्रशासकीय अपयश आहे असं सतेज पाटील म्हणाले. ते म्हणाले की, संभाजीराजेंनी भूमिका घेताना जरा विचार करून घ्यायला हवी होती. हा विषय न्यायप्रविष्ट होता, त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बसून चर्चा करून काय मार्ग काढता येईल, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि अतिक्रमण काढलं जाईल असा विचार त्यांनी करायला हवा होता. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. 


संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा का होत नाही? हे सर्व घडायचं शासन वाट बघत होतं का? असा प्रश्न सतेज पाटील यांनी विचारला. पालकमंत्र्यांनीसुद्धा बैठक घेऊन प्रशासनाने काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. 


पुण्यातले लोकांनी येऊन येऊन हिंसाचार केला


पुण्यातील काही लोक येऊन त्यांनी हा हिंसाचार केल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला. पुण्यातले लोक कोल्हापुरात येतात काय आणि ही दंगल होते काय अशा प्रकार घडत असताना पोलिस अधीक्षकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केली. ज्या दिवसापासून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित या जिल्ह्यात आले आहेत तेव्हापासून कोल्हापुरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाने परत बोलवावं, तरच या घटना थांबतील असं सतेज पाटील म्हणाले. 


न्यायालयात सरकारचे वकील उपस्थित राहत नाहीत


सतेज पाटील म्हणाले की, मागच्या वेळी देखील अशीच घटना घडली होती, त्यावेळी तेथील विद्यमान आमदार विनय कोरे यांनी भूमिका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण न्यायालयात असताना प्रशासनाने काय केलं? या केसच्या सुनावणीवेळी शासनाचे वकील उपस्थित राहत नाहीत अशी माहिती आहे. म्हणजे शासनाची काय आहे भूमिका हे दिसून येते. हे सर्व मोटिव्हेटेड आहे असं वाटत आहे. 


विशाळगडावर मदत घेऊन जाणार


सतेज पाटील म्हणाले की, विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने विशाळगडावर ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना मदत घेऊन जाणार आहोत. सरकार कधी मदत करेल काही माहित नाही, मात्र सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही मदत घेऊन जाणार आहोत असं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. 


ही बातमी वाचा: