कोल्हापूर : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीस थाटात प्रारंभ झाला आहे. आज (28 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजल्यापासून कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाल्यानंतर कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पहिला मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ करण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


तुकाराम माळी तालीम मंडळाने आजवर आपल्या मिरवणुकीत सातत्याने कोल्हापूरच्या दुखण्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या मिरवणुकीत मंडळाची अग्रभागी असलेली मेबॅक कारने चांगलेच लक्ष वेधले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोकपणे बॅनर्सच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी? विचारणा करण्यात येत आहे.


काय म्हटलं आहे बॅनर्समध्ये?


काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी समदं ओके नाही कोल्हापूर. काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीसमोर मेबॅक कार मार्गस्थ झाली असून कोल्हापूरचे प्रश्न घेऊन जात असताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


कोल्हापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत आहे. शहराची हद्दवाढ गेल्या 50 वर्षांपासून झालेली नाही. कोल्हापूर शहराचे रस्ते जैसे थेच असल्याने वाहतूक कोंडी नित्याची होऊन गेली आहे. पंचगंगा विषगंगा होऊन गेली आहे. कोल्हापूरचे रस्ते पूर्णतः खड्ड्यात गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे प्रश्न तुकाराम माळी तालीम मंडळाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या समस्या तातडीने सुटाव्यात असा संदेश या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. कोल्हापुरचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी सर्वपक्षीय रेटा तयार झाला पाहिजे अशीच मागणी आता कोल्हापूरकरांमधून होत आहे. 


विसर्जन मिरवणुकीत अवतरणार चांद्रयान, सूर्ययान


दुसरीकडे, भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी चांद्रयान मोहिम, सूर्याच्या अभ्यासासाठी नुकतीच करण्यात आलेली आदित्य एल 1 मोहिम कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीत आकर्षण असणार आहे. पारंपरिक वाद्ये, लेझर लाईट, डीजे सुद्धा मिरवणुकीत असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत धनगरी ढोलही आकर्षण असणार आहेत. एलईडी स्क्रीनही विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. कोल्हापुरातील तालमींचे विसर्जन मिरवणुकीत नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच तालीम मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष तयारी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या