कोल्हापूर : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत आधी येण्यावरून दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडल्याने मध्यरात्री तुफानी राडा झाला. यावेळी हाणामारी होऊन दगडफेकही झाल्याने तीन जखमी झाले. मंडळाच्या वादात देखावे पाहण्यासाठी आलेले दोघे जखमी झाले. यावेळी पोलिसांनी वेळीच दखल घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवले. या प्रकाराने खरी कॉर्नर परिसरात तणाव निर्माण झाला होता. जखमी झालेल्या तिघांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले.


मुख्य मिरवणूक मार्गात येण्यावरून वादाला सुरुवात 


कोल्हापुरात मुख्य मिरवणूक मार्गासह समांतर आणि पर्यायी असे तीन मार्ग आहेत. यामध्ये मुख्य मिरवणुकीत मार्गात प्रवेश करण्यासाठी मंडळांची चढाओढ असते. त्यामुळे मार्गात येण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासूनच तयारी सुरु करण्यात आली होती. एका मंडळाची ट्रॉली व कार्यकर्ते खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करीत असतानाच खरी कॉर्नरजवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. याच कारणातून वादाची ठिणगी पडली. या वादातून हाणमारी होऊन दगडफेकही झाली. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आलेले लोक वाट मिळेल त्या दिशेने धावू लागले. या दगडफेकीत तिघे जखमी झाले. 


पोलिसांनी कार्यकर्ते पांगवल्याने अनर्थ टळला


दोन मंडळ भिडल्याची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांना पांगवले. पोलिसांची आणखी एक तुकडी यावेळी दाखल झाली. पोलिसांनी खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस गाडी लावून दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही कार्यकर्ते वाद घालू लागल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तेव्हा कार्यकर्ते बाजूला गेले. 


मंडळांकडून जय्यत तयारी


दुसरीकडे, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बुधवारी मध्यरात्रीपासूनच अनेक मंडळांनी तयारी केली आहे. मंडळानी विद्युत रोषणाई तसेच ध्वनीयंत्रणेची जोडणी केली आहे. मिरवणूक मार्गावर मिरजकर तिकटी परिसरात मिरवणूक वाहने आणण्यास रात्री साडे अकरापासून सुरूवात झाली होती. आज (28 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता मुख्य मिरवणुकीचे उद्घाटन होणार आहे. मुख्य मिरवणुकीत प्रवेश मिळण्यासाठी सर्वच मंडळांचा आटापिटा असतो. सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच होणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. महापालिकेलाही सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मार्गावर 66 सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या