कोल्हापूर : कोल्हापुरात उद्या (28 सप्टेंबर) होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. सर्वच मंडळांकडून विसर्जन मिरवणूक संस्मरणीय करण्यासाठी तयारी केली आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी चांद्रयान मोहिम, सूर्याच्या अभ्यासासाठी नुकतीच करण्यात आलेली आदित्य एल 1 मोहिम विसर्जन मिरवणुकीत आकर्षण असणार आहे. पारंपरिक वाद्ये, लेझर लाईट, डीजे सुद्धा मिरवणुकीत असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत धनगरी ढोलही आकर्षण असणार आहेत. एलईडी स्क्रीनही विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. कोल्हापुरातील तालमींचे विसर्जन मिरवणुकीत नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच तालीम मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष तयारी केली आहे.
इराणी खणीमध्येच विसर्जन होणार
सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्येच होणार आहे. याबाबतचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. महापालिकेलाही सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मार्गावर 66 सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.
रात्री बारानंतर साउंड सिस्टीमसह पारंपरिक वाद्यांवर बंदी
दरम्यान, उद्या विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री 12 नंतर साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर सन्नाटा असणार आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सवात पहिल्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी सकाळी 6 ते 12 बारापर्यंत नियमात सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी आहे.
रात्री बारानंतर साउंड सिस्टीम किंवा पारंपरिक वाद्ये सुद्धा बंद करावी लागणार आहेत. अशी वाद्ये किंवा साउंड सिस्टीम सुरू ठेवल्यास ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत. मंडळाच्या अध्यक्षांसह वाद्ये किंवा सिस्टीम मालकांवरही गुन्हा दाखल होणार आहे.
सर्व मार्गावरील बससेवा बंद राहणार
दरम्यान, अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने उद्या गुरुवारी सर्व मार्गांवर केएमटी बससेवा तसेच सवलत पास वितरण केंद्र बंद राहणार आहेत. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक ज्याप्रमाणे सुरू होईल, त्यानुसार बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केएमटीकडून देण्यात आली.
विसर्जन मिरवणुकीचा मार्ग
उमा टॉकीज चौक, सावित्रीबाई चौक, दिलबहार चौक, टेंबे रोड, खाँ साहेब पुतळा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश चौक, रंकाळा स्टँड, जावळाचा गणपती चौक, राज कपूर पुतळा, इराणी खण
समांतर मार्ग कसा असेल
उमा टाकी चौक, आझाद चौक, कॉमर्स कॉलेज, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, छत्रप शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, गंगावेश, इराणी खण
पर्यायी मार्ग कसा असेल
उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, यल्लमा मंदिर चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरा सागर हॉल, सुधाकर जोशी नगर, चौक देवकर पाणंद, क्रशर चौक, इराणी खण
इतर महत्वाच्या बातम्या