Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव संजय शिंदे यांनी दिली आहे. 


या बैठकीत 10 जानेवारी 2022 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना मार्च 2022 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2021-22 कोविड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 माहे नोव्हेंबर 2022 अखेरील खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मधील पुनर्विनियोजनास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत. 


प्रारूप आराखडे आय-पास प्रणालीवर त्वरित सादर करावेत


दरम्यान, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सर्व विभागाकडून विविध विकास कामासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले जातात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे सादर करताना यंत्रणांनी संगणकीय आय-पास(I-PASS) प्रणालीवर त्वरित सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले आहेत.


शिंदे यांनी म्हटले आहे की, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे तसेच निधी मागणीचे प्रस्ताव व प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र हे संगणकीय आय-पास प्रणालीवर 20 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत सादर करावेत. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या विविध विषय, मागण्या व प्रश्नाबाबत संबंधित विभागांनी स्पष्ट व अद्यावत अनुपालन अहवाल नियोजन समितीकडे त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मध्ये 425 कोटीच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. यापैकी 166 कोटीच्या आलेल्या विविध प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून अन्य सर्व संबंधित विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठीचे त्वरित प्रस्ताव सादर करावेत. व ज्या शासकीय यंत्रणांना पुनर्नियोजन अंतर्गत निधीची आवश्यकता आहे त्या यंत्रणांनी ही त्वरित नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावेत, असेही शिंदे यांनी सांगितले. 


पुढील वर्षासाठीच्या स्थानिक सुट्टया जाहीर


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2023 मध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया दि. 13 डिसेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये जाहीर केल्या आहेत. या स्थानिक सुट्ट्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सोमवार दिनांक 26 जून 2023, ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 आणि दिवाळी (अतिरिक्त) सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 अशा तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या