Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : शिरोळ तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवलं आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण यड्रावकर गटाच्या समर्थकांनी चिवट झुंज देत विजय खेचून आणला. 


यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, अकिवाट, कवठेसार, उमळवाड, औरवाड, नवे दानवाड, कनवाड, संभाजीपुर, हेरवाड आणि चिंचवाड या गावांमध्ये यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला मिळालेल्या या यशामुळे यड्रावकर गटामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असलेल्या माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व विजयी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.


पुलाची शिरोलीत महाडिक गटाकडून सतेज पाटील गटाचा सुफडा साफ


दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या.  शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचे हे होम ग्राऊंड आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाडिक आघाडीकडून शाहू आघाडीने सत्ता हस्तगत केली होती. 


कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के!


कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. कागल तालुक्यात मुश्रीफ गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत या तीन ग्रामपंचायतींमध्ये घाटगे गटाने बाजी मारली आहे. बामणीत शिव शाहू ग्रामविकास आघाडी सरपंच पदासह आठ जागांवर विजयी झाली आहे. शेतकरी विकास आघाडी दोन जागावर विजयी झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या