Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यामुळे गावगाड्यावर ऊसतोडीसह प्रराचाला सुद्धा रंगत वाढत चालली आहे. आज मतदानापूर्वी अखेरचा रविवार असल्याने उमेदवारांकडून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच ताकद लावली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून सर्वाधिक पन्हाळा तालुक्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 


ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात


दरम्यान, प्रचार एका बाजूने शिगेला पोहोचला असतानाच प्रतिस्पर्धी अंधश्रद्धेच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी सुद्धा चांगलेच प्रयत्न सुरु आहेत. गावगाड्यावर उतारा टाकण्यावर अजूनही विश्वास ठेवला जातो, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दारात, लिंबू, मिरच्या, काळ्या बावल्या गुलाल लावलेल्या दिसून येत आहेत. यातून काय साध्य होणार हा संशोधनाचा मुद्दा असला, तरी ज्यांच्या मनात अनामिक भीती यांना अधिकच भीतीच्या छायेत सोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  


भावनेच्या राजकारणाला जोर 


ग्रामपंचायतीचे राजकारण हे पूर्णत: स्थानिक मुद्यांवर आणि भावनिक होत असते. त्यामुळे परडीवर हात मारायला लावणे, शपथ घालणे, रानाला बांध लागून असेल, तर त्याची भीती घालणे, सेवा संस्था असेल, तर त्याची भीती घालणे, दूध संस्था असल्यास त्याची भीती घालणे, असे प्रकारही सर्रास घडून येतात. त्यामुळे  एक भावनेचा बाजार सर्वाधिक मांडला जातो.


Kolhapur District Gram Panchayat Election : चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक जोर  


दुसरीकडे, करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे बिनविरोध झालेल्या 43 ग्रामपंचयती वगळल्यास 431 ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 1193 उमेदवार रिंगणात आहेत, तर एकूण 1650 प्रभागांमध्ये 8995 सदस्यपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. 


दुरंगीपासून पंचरंगीपर्यंत लढत


दरम्यान, अनेक गावांमध्ये दुरंगी लढतीपासून पंचरंगी लढती सुद्धा होत आहेत. करवीर तालुक्यातील म्हाळूंगेत महिलांनी प्रकाश चौगले यांनीच अर्ज भरावा यासाठी मोर्चा काढला होता. त्या गावात दुरंगी लढत होत आहे. कागल कट्टर विरोधी असलेल्या मुश्रीफ आणि घाटगे गटातील काही कार्यकर्ते काही ग्रामपंचयतींच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या