कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) भाजपमध्ये पक्षांतर्गत पदाधिकारी निवडी झाल्यापासून कमालीचा असंतोष पसरला आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी जाहीरपणे चव्हाट्यावर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) 7 ऑक्टोबर रोजी प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विशेष करून गडहिंग्लज, आजरा तालुक्यात पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोडी सुरु आहेत. याच कुरघोडीतून आजरा भाजप कार्यालय सुद्धा बंद करण्यात आले होते. बोर्ड सुद्धा काढून नेण्यात आला होता.

Continues below advertisement

पदाधिकारी निवडीमुळे कमालीची नाराजी

त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये गडहिंग्लज आणि आजरा या दोन तालुक्यांमधील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये करण्यात आलेल्या पदाधिकारी निवडीमुळे कमालीची नाराजी पसरली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने ताकद पणाला लावली आहे. दोन्ही लोकसभा जागांसह चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांवरही त्यांनी लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रशेखर यांचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे जुन्या कार्यकर्त्यांकडून पाठ फिरवण्यात आली होती. त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूर दौऱ्यात ही नाराजी त्यांच्यासमोर प्रकट होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. 

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे 7 ऑक्टोबरला गडहिंग्लज दौऱ्यावर असतील. या दौऱ्यामध्ये शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. हा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केले आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी 24 सप्टेंबरला माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. 

Continues below advertisement

सोशल मीडिया संयोजकपदी हर्षद कुंभोजकर यांची निवड 

दरम्यान, भाजप जिल्हा (महानगर) सोशल मीडिया संयोजकपदी हर्षद कुंभोजकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी त्यांची निवड आहे. पश्‍चिम विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. हर्षद कुंभोजकर हे गेली 18 वर्षे भाजपसाठी काम करत आहेत. 2014 पासून त्यांच्याकडे सोशल मीडिया संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या