Kolhapur Crime : कोल्हापुरातील बोंद्रेनगरमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून अवघ्या 19 वर्षीय युवतीने आत्महत्या करुन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना 15 मार्च रोजी घडली होती. त्या युवतीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. मारुती हरी बोडेकर (वय 24, रा. बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंगरोड) असे त्याचे नाव आहे. त्याची आई विठाबाई आणि आणि वडील हरी बोडेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबतची फिर्याद मुलीची आई शांताबाई शाहू बोडेकर यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाच्या त्रासाला कंटाळून नकुशा बोडेकर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी नकुशाने लाल आणि निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मारुती’ नावाचा संदर्भ होता. तिच्या आईनेसुद्धा दिलेल्‍या फिर्यादीत तरुण मारुतीसह त्याच्या आई-वडिलांमुळे नकुशाने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. बेपत्ता झालेल्या मारुतीला गगनबावडा या त्याच्या मूळ गावातून अटक केली.


एकतर्फी प्रेमातून त्रास


मारुती नकुशावर प्रेम करत होता. तो नकुशाचा पाठलाग करुन वारंवार तिला त्रास देत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून नकुशा तीन दिवसांपूर्वी सावत्र आईकडून चुलत्याच्या घरी राहण्यास आली होती. त्यावेळी तिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून मारुती हा तिला त्रास देत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नकुशाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. पोलिसांनी अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मारुतीच्या आई-वडिलांनीही तुझ्यामुळे माझ्या मुलाची बदनामी होत असल्याचे सांगून तुला आणि तुझ्या आईला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मारुतीबरोबरच तिच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नकुशाने काय म्हटले होते सुसाईड नोटमध्ये?


"एका तरुणामुळे मी जीव देत आहे. बोंद्रेनगरात राहायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. सापडशील तिथे मारणार, अशी धमकी त्याने दिली होती. तो मला सुखाने जगू देणार नाही. त्याच्यामुळेच मी जीव देत आहे. सॉरी आई, नाना. त्याला माफ करु नका," असे चिठ्ठीत लिहिले होते. तसेच लाल रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने ‘त्रास देणाऱ्या मारुतीचे नाव लिहून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले होते. "माझा जीव फक्त त्याच्यामुळेच रडत रडत गेलाय. त्याला शिक्षा द्या. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल," असं नमूद केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या