Kolhapur Crime : दुचाकीने महिलेचा पाठलाग करुन विनयभंग करणाऱ्या आरोपी स्वप्नील रामचंद्र घोडके (वय 30 रा. सेनगाव, ता. भुदरगड) याला दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मुख्य न्यायदंडाधिकारी शैलेश बाफना यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी स्वप्नील घोडकेने पाच ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी दोन वाजता कोल्हापुरातील व्हीनस टॉकीज ते दाभोळकर कॉर्नर या मार्गावर (Kolhapur Crime) दुचाकीवरून पीडित महिलेचा पाठलाग केला. आरोपीने महिलेकडून पाहून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर संबधित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात घोडकेच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा महिला पोलिस नाईक यांनी तपास केला. आरोपीला अटक करुन कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. 


मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांचा युक्तीवाद, फिर्यादी महिलेची साक्ष लक्षात घेऊन कोर्टाने आरोपी घोडके याला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.


पतीचा सुपारी देऊन खून, पत्नी, प्रियकरासह आठ जणांना जन्मठेप


दरम्यान, पती अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून त्याचे अपहरण करून निर्घृण खून केल्याप्रकरणी निर्दयी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आठ जणांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 24 जानेवारी रोजी जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये क्रूर पत्नीसह अन्य एका महिलेचा समावेश आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  खटला सुरू असताना शीर धडावेगळे करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाला, तर अन्य दोन फरार आहेत. नितीन बाबासाहेब पडवळे (रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांचे अपहरण करून जानेवारी 2011 मध्ये खून करण्यात आला होता.  


अपहरण करून निर्घृण खून


दरम्यान, सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार नितीनच्या पत्नीसह 11 आरोपींनी नितीन बाबासाहेब पडवळे यांचे अपहरण करून खून केल्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. रवी रमेश माने, दिलीप व्यंकटेश दुधाळे, मनेश सबण्णा कुचकोरवी, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दोडाप्पा माने, आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे, लीना नितीन पडवळे आणि गीतांजली विरुपाक्ष मेनशी या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, गुन्ह्यातील सतीश भीमसिंग वडर (रा. सायबर चौक) आणि इंद्रजित ऊर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. कावळा नाका) फरार आहेत. मृत पडवळे याचे शीर धडावेगळे करणारा अमित चंद्रसेन शिंदे (रा. विक्रमनगर) याचा सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या