Kolhapur Crime : लग्नाचा पती अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून त्याचे अपहरण करून निर्घृण खून केल्याप्रकरणी निर्दयी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आठ जणांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये क्रूर पत्नीसह अन्य एका महिलेचा समावेश आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. खटला सुरू असताना शीर धडावेगळे करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाला, तर अन्य दोन फरार आहेत. नितीन बाबासाहेब पडवळे (रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांचे अपहरण करून जानेवारी 2011 मध्ये खून करण्यात आला होता.
शीर धडावेगळे करणाऱ्या अमितचा यापूर्वीच मृत्यू
दरम्यान, सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार नितीनच्या पत्नीसह 11 आरोपींनी नितीन बाबासाहेब पडवळे यांचे अपहरण करून खून केल्या प्रकरणा शिक्षा सुनावण्यात आली. रवी रमेश माने, दिलीप व्यंकटेश दुधाळे, मनेश सबण्णा कुचकोरवी, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दोडाप्पा माने, आकाश ऊर्फ अक्षय सीताराम वाघमारे, लीना नितीन पडवळे आणि गीतांजली विरुपाक्ष मेनशी या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दरम्यान, गुन्ह्यातील सतीश भीमसिंग वडर (रा. सायबर चौक) आणि इंद्रजित ऊर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. कावळा नाका) फरार आहेत. मृत पडवळे याचे शीर धडावेगळे करणारा अमित चंद्रसेन शिंदे (रा. विक्रमनगर) याचा सुनावणी सुरू असताना मृत्यू झाला होता.
2011 मध्ये घडली होती घटना
आरोपी गीतांजलीने नितीनला 11 जानेवारी 2011 मध्ये आर. के. नगर येथे बोलावले होते. त्यानंतर नितीनचे अपहरण करून त्याच दिवशी नितीनचा निर्घृण खून करण्यात आला. यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात नितीन पडवळे बेपत्ता असल्याची फिर्याद 14 जानेवारी रोजी दाखल झाली होती. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर आंबा ते विशाळगड मार्गावरील वाघझरा दरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह 10 दिवसांनी जानेवारी रोजी सापडला होता.
अनैतिक संबंधात अडथळा म्हणून संपवले
मयत नितीनची पत्नी लीना पडवळे आणि रवी माने यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाचा पती प्रेमात अडथळा वाटू लागल्याने नितीनच्या खुनाचा कट रचण्यात आला. लीनाचा प्रियकर रवीने दिलीपला दीड लाख रुपयांची सुपारी नितीनला संपवण्यासाठी दिली. एका हॉटेलमध्ये नितीनच्या खुनाचा कट रचण्यात आल्यानंतर 12 जानेवारी 2011 रोजी आर. के. नगर येथील खडीचा गणपती मंदिर या ठिकाणी नितीनला बोलावून मारहाण करण्यात आली. त्यानंतर अपहरण करून सर्वजण वाठार-बोरपाडळे मार्गे विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात वाघझरात पोहोचले. नराधम आरोपींनी नितीनचे शिर धडावेगळे करून मृतदेह दरीत फेकला.
आरोपी अमितने नितीनचे शीर, शर्ट, मोबाईल हॅण्डसेट असे कॅरीबॅगेत घालून धड दरीत फेकले. त्यानंतर रवीला माहिती देण्यात आली. त्यानंतर मोटारसायकल आणि उर्वरीत शीर, शर्ट, मोबाईल यासह अन्य साहित्य वारणा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आले. या प्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी तपास करून चार्जशीट दाखल केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या