कोल्हापूर : कोल्हापूर शहरात (Kolhapur Crime) गणेशोत्सव सुरु झाल्यापासून तलवार आणि कोयत्याचा नंगानाच सुरुच आहे. कसबा बावड्यात पाठलाग करून कोयता हल्ला ताजा असताना बोंद्रेनगरात तलवार हल्ला केल्याची घटना घडली. दुसरीकडे, बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्यात आली. यावेळी दुचाकींचे नुकसान करून शेजाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे गौरी गणपतीमुळे उत्साहाचे वातावरण असताना उपद्रवी टाळक्यांकडून तलवार, कोयता घेत नंगानाच सुरु आहे. दरम्यान, बावड्यातील आंबेडनगरमध्ये झालेल्या कोयता हल्ल्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. 


बोंद्रेनगरात तलवार हल्ल्यात तीन जखमी 


शहरातील बोंद्रेनगर परिसरात जांभळे कॉलनीत पूर्ववैमनस्यातून तलवार आणि लाठीहल्ल्यात आनंदा मधुकर बोडेकर (वय २३) हा तरुण जखमी झाला. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेली त्याची आई आणि पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास हा हल्ला झाला. आनंदा हा सोनार असून काम संपल्यानंतर गणेश मंडळात आरतीसाठी गेला असताना 15 ते 20 जणांच्या टोळक्याने तलवार व लाठीहल्ला केला. यावेळी त्याची आई आणि पत्नीने आनंदाला सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोघींनाही धक्काबुक्की करण्यात आली. जखमी आनंदाला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला 


बावड्यातील कोयता हल्ला ताजा असतानाच भाजप पदाधिकारी सदानंद राजवर्धन यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आंबेडकरनगरमध्येहा प्रकार घडला. राजवर्धन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर सहा संशयितांविरोधात शाहुपुरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 ते 15 जणांच्या जमावाने शिवीगाळ करत घरासमोर लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले. पती सदानंद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. शेजारी राहणाऱ्या मयुरेश शरद शिंगे यांनाही मारहाण करण्यात आली. 


कोयता परस्परविरोधी फिर्यादी दाखल


दरम्यान, कसबा बावड्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात झालेल्या कोयता हल्ल्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यामध्ये एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल विलास कांबळे (वय 24, रा.आंबेडकर नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोयता हल्ल्यात जखमी सुरज कांबळेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. सूरजच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर वार झाले आहेत. हल्ला होताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या वैभव माजगावकरवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या