Kolhapur Crime: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरांचे थैमान सुरुच आहे. इचलकरंजीमध्ये चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घालताना तब्बल आठ बंद फ्लॅटना लक्ष्य करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हौसिंग सोसायटीमधील गाढ झोपेत असतानाच फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. कबनूरमधील सरस्वती हौसिंग सोसायटीमधील तीन फ्लॅटधारकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिन्यांसह चांदीचे दागिने, रोख अडीच लाख रुपये असा एकूण 10 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरीच्या गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अन्य फ्लॅटधारक बाहेर असल्याने चोरीतील मुद्देमाल वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग चोऱ्यांचे सत्र सुरु आहे.


बंद असलेल्या फ्लॅटवर डल्ला मारला 


चोरट्यांनी फ्लॅटधारक बाहेर गेल्याची संधी साधताना बंद असलेल्या सात फ्लॅटमध्ये डल्ला मारला. सोसायटीमधील अजय दायमा, आनंद निंबाळकर, वासुदेव बांगड, राजकुमार थोरवत यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडत सोन्याचे दागिने, रोकड आणि चांदीचे क्वॉईन पळविले. शोभा श्रीवास्तव, महेश पांडव व सुनील पाटील यांच्याही फ्लॅटमध्ये चोरी झाली. एकुण 10 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरीच्या पद्धतीवरून चोर सराईत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी यावेळी श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्‍वानपथक सरस्वती सोसायटीच्या पाठीमागे घुटमळले.


इचलकरंजी भागात सलग चोऱ्या


चार दिवसांपूर्वीच कोरोची (ता. हातकणंगले) येथे घराचे कुलूप तोडून चोराने सव्वा तोळे सोन्या -चांदीचे दागिने व रोख 65 हजार रुपये असा एकूण एक लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ही दिवसाढवळ्या चोरी झाली होती. 8 दिवसांपूर्वी कबनूरमध्येच व्यापाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा कपाटे फोडली होती. चोरांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 5 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता.


कबनूरमधील मोहिद्दीन बापुलाल मारूफ 13 मे रोजी कर्नाटकात विवाहासाठी गेल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. परतून आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्याची नासधूस करून तीन रुमममधी सहा तिजोऱ्या फोडल्याचे आढळून आले. चोरट्यांनी सोन्याची अंगठी, कानातील डुल आणि रोख 70 हजार असा 1 लाख 5 हजाराच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या