Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी स्वतः हातकणंगले (Hatkanangle) लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची घोषणा केली असून त्याचबरोबर राज्यात सहा ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे म्हटले आहे. राजू शेट्टी यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रणनीती स्पष्ट केली. शिरोळ तालुक्यातील उदगावमधील कल्पवृक्ष गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मी जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीतून लढवणार
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, हातकणंगले लोकसभा निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीतून लढवणार आहे. स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत. समोर कोण आहे, कोणता पक्ष आहे हे आम्ही बघणार नाही. मला शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. यासाठीच मी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. त्यांनी सांगितले की मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये गाफील राहिल्याने पराभव झाला. संघर्ष केला असतानाही पराभव झाला. मात्र, पराभवाने मी खचून जाणारा माणूस नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीमधून आम्ही आता गेल्यवर्षीच बाहेर पडलो आहे. आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला जागा सोडण्याचा प्रश्न येतच नाही. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांना आम्ही समान अंतरावर ठेवले आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेच्या सहा जागा लढवणार
दरम्यान, यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी लोकसभेच्या सहा जागा लढवणार असल्याचे सांगितले. त्या जागांवर उमेदवारी जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असून या मतदारसंघातून धैर्यशील माने खासदार आहेत. सध्या ते शिंदे गटात आहेत. मात्र, धैर्यशील माने शिंदे गटात असले, तरी ते शिवसेनेच्या चिन्हावर लढणार की भाजपकडून शड्डू ठोकणार? याबाबत स्पष्टता आलेली नाही. भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर कंबर कसण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडूनही अजून उमेदवारीबाबत स्पष्टता आलेली नाही. मात्र, राजू शेट्टी यांनी पराभवानंतरही खचून न जाता संघटनेच्या माध्यमातून सातत्याने जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सातत्याने धारेवर धरले आहे. बदल्यांमधून होणारी खाबूगिरी त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या