Kolhapur News: इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या दूधगंगा नदीतून सुळकूड पाणी योजनेवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज (9 ऑगस्ट) इचलकरंजीमध्ये सांगली रोडवर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या मानवी साखळी आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी देण्यास कागल तालुक्यातून कडाडून विरोध होत आहे. दोन्ही बाजूने होत असलेल्या विरोधामुळे हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं आहे. पाणी मिळण्यासाठी इचलकरंजीमधील नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत, तर पाणी देणार नाही यासाठी कागल तालुक्यातील नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे एकाच जिल्ह्यातील दोन सुळकूड पाणी योजनेवरुन दोन गट पडले आहेत.


यावेळी सांगली नाका, आसरानगर, शिक्षक कॉलनी, गुलमोहर कॉलनी, वृंदावन कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी, सुरभी कॉलनी, साईट क्र.102, पाटील मळा, ऋतुराज कॉलनी, आदिनाथ हौसिंग सोसायटी, आदी भागातील नागरिक उपस्थित होते. मानवी साखळीच्या माध्यमातून क्रांती दिनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. सांगली रोडवर पाटील मळा ते सांगली नाका या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इचलकरंजीसाठी मंजूर झालेली दुधगंगा (सुळकूड) योजना झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी इचलकरंजीतून होत आहे. यासाठी सर्वपक्षीय सुळकूड पाणी योजना कृती समितीतर्फे प्रांत कार्यालयावर २१ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. 


दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संबंधिताची तत्काळ बैठक घ्यावी


दरम्यान, उपलब्ध पाणीसाठा, वाढती लोकसंख्या याचा विचार करता इचलकरंजीसाठी सूळकुड उद्भव दूधगंगा पाणी योजना राबवणे गरजेचे आहे. त्यामध्ये कागल तालुक्यातील शेती, पिण्याच्या पाण्याला कोणतीही बाधा येणार नाही. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संबंधिताची तात्काळ बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्‍नी लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 


उपोषणाचा इशारा


दुसरीकडे, इचलकरंजी शहराला मंजूर झालेली सुळकूड पाणी योजना रद्द करावी या मागणीसाठी 11 ऑगस्टपासून शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमधील ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. दत्तवाडसह टाकळीवाडी, दानवाड, घोसरवाड या गावातील व्यवहार बंद ठेवून दत्तवाडमध्ये गांधी चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला. पाच गावच्या पदाधिकारी बैठक पार पडली यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते.


इतर महत्वाच्या बातम्या