कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूरचा (Kolhapur) सांस्कृतिक ठेवा असलेला अन् कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosale Natyagruha) आगीत भस्मसात झालं आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरचा आत्माच या घटनेने होरपळला गेला. करवीरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदानाचे व्यासपीठ शाॅर्ट सर्किटने लागलेल्या आगीत खाक झाले. त्यामुळे कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या मानबिंदूची राख होऊन गेली आहे.  आग इतकी भीषण होती की क्षणार्धात नाट्यगृहाची बाल्कनी सुद्धा क्षणात कोसळून गेली. 


कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा डोळ्यादेखत नामशेष


या आगीमध्ये झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींच्या तातडीने निधी देण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूरचा वारसा पुन्हा एकदा ताकतीने उभा करू, अशी भावना समस्त कोल्हापूरकरांसह राजकीय नेत्यांमधून व्यक्त होत आहे. मात्र ज्या पद्धतीने कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा डोळ्यादेखत नामशेष झाला ते पाहून कोल्हापुरातील कलाकारांची मने सुद्धा प्रचंड दुखावले गेली आहेत. अनेक कलाकार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये पोहोचले. यावेळी आग पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर राहिला नव्हता. ज्या खासबाग मैदानाने कोल्हापूरसाठी शेकडो मल्ल दिले, कोल्हापूरचा कुस्तीचे परंपरा देशपातळीवर गेली तोच कोल्हापूरच्या मध्यवर्ती परिसरातील असणारा हा सांस्कृतिक ठेवा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मनाला होणाऱ्या वेदना या चिरंतर कुरतडणाऱ्या असतील यामध्ये शंका नाही. 


कोल्हापूरला पाणी पाणी करण्याची वेळ


गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजू आणि खासबाग मैदानाचे व्यासपीठ आगीमध्ये पूर्णतः जळून खाक झालं आहे. नाट्यगृहातील व्यासपीठ, खूर्च्या, विद्युत यंत्रणा जळून खाक झाली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसा मात्र संपून गेला आहे. ज्या कोल्हापूरकरांची महापुराने दैना झाली त्या कोल्हापूरला पाणी पाणी करण्याची वेळ आली. नाट्यगृहाच्या मागील बाजूने आग लागली. सागवान आणि फर्निचर मोठ्या प्रमाणात असल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की तब्बल अडीच तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक गाड्याही पाचारण करण्यात आल्या.


मात्र, केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये असलेलं सागवान लाकूड, खुर्च्या आणि खासबाग मैदानाच्या व्यासपीठावरील सुद्धा सागवान लाकूड असल्याने रौद्ररूप धारण केलं होतं. त्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत शर्तीचे प्रयत्न करावे लागले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज (9 ऑगस्ट) जयंती असल्याने केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये मंडप घालण्यात आला होता. या मंडपामुळे सुद्धा आग विझवण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर मंडप खोलून तातडीने बाजूला करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये दाखल झाल्या.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कोल्हापुरातील राजकीय मंडळी सुद्धा यावेळी उपस्थित होती. मात्र कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा डोळ्यात देखत भस्मसात होताना पाहण्याची वेळ सर्वांवर आली. ज्या कोल्हापूर जिल्ह्याने महापूर पाहिला त्याच कोल्हापूरसाठी तब्बल अडीच तास पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली. त्यामुळे थोडासा तरी पाऊस झाला असता तरी आपला वारसा सुरक्षित राहिला असता अशीच भावना व्यक्त होत होती.


इतर महत्वाच्या बातम्या