KDCC ED raid : कोल्हापूर जिल्हा बँकेतील ईडीच्या छापेमारीनंतर पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या अधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री उशिरा सोडून देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या (ED) पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आलं होतं. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते.
मुश्रीफ यांची सत्ता असलेल्या (Hasan Mushrif ED Raid) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशीमधील आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील शाखेत ईडीने छापेमारी केली होती. छापेमारीनंतर तिन्ही शाखेतील कागदपत्रांचे बाॅक्स झेराॅक्स काढून आपल्यासोबत नेले आहेत. 11 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या छापेमारीचं काय झालं? हा प्रश्न अनुत्तरित असतानाच या कारवाईतून नेमकी कोणती माहिती हाती लागली याबाबत कोणतीही माहिती ईडीकडून अद्याप सादर करण्यात आलेली नाही.
ईडीकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना ईडीने सोडल्यानंतर ते आज कोल्हापुरात पोहोचतील. या अधिकाऱ्यांवर छापेमारीपासून ते कालच्या मुंबईतील चौकशीतही मुश्रीफांच्या निगडीत प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. मुश्रीफांच्या संदर्भातील माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याची चर्चा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. कर्मचाऱ्यांना अतिशय अपमानास्पद वागवल्याचे बँक कर्मचारी सांगत आहेत. मुश्रीफ यांच्या संदर्भात कागदपत्रे दाखवण्यासाठी सातत्याने ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात होता, अशीही माहिती समोर येत आहे.
अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेतील अधिकारी सुनील लाड यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईडीकडून 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते. दरम्यान, ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता.
महत्वाच्या इतर बातम्या :