KDCC ED Raid : ईडीकडून तब्बल 70 तासांनी सुटका झाल्यानंतर कोल्हापुरात परतलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे (KDCC ED Raid)  मुख्यालयाच्या प्रांगणात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर शहरातील शाखेतील कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखरे विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर, व निरीक्षक राजू खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. 


यावेळी बोलताना बळीराम पाटील म्हणाले की, ईडीने केलेली छापेमारी ही केवळ बँकेवर नसून तो सहकार क्षेत्रावर आणि समस्त शेतकऱ्यांवरच घातलेला घाला आहे. अतुल दिघे म्हणाले की केडीसीसी बँकेचे रिझर्व बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून लेखा परीक्षण झाले असतानाही ईडीची रेड म्हणजे निवड सूडबुद्धी आहे अशा प्रकाराने सहकार आणि शेतकरीच उध्वस्त होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले की, केडीसीसी बँक हे कुटुंब आहे. या प्रसंगात बँकेच्या जिल्हाभरातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे पाठबळ दिले. त्यामुळे आम्हा सर्वांचे आणि आमच्या कुटुंबीयांचे मनोबल टिकून राहिले. 


मुंबईत काय चौकशी झाली?


दरम्यान, ईडीने कोल्हापुरातील छापेमारीत जी चौकशी केली त्याच संदर्भाने चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारपर्यंत कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर जबाब नोंदवले. कोणताही त्रास न देता जबाब नोंदवून घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी बँकेचा व्यवहार पारदर्शक असल्याचे सांगत मार्चपर्यंत आणखी चांगली कामगिरी करून ईडीला दाखवू, असे आवाहन यावेळी केले. 


सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका


दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेतील अधिकारी सुनील लाड यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईडीकडून 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते. दरम्यान, ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता. 


महत्वाच्या इतर बातम्या :