सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर काल इंदापुरात (9 डिसेंबर) पुण्यात चप्पलफेक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्ष शब्दात खोचक टोला लगावला आहे.आरक्षण मागणीवरुन राज्यात बनलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात तणाव कसा वाढवायचा याचीच काहीजण जाणीवपूर्वक काळजी घेत आहेत. जातीजातींमधील भेद वाढवून तणाव निर्माण करायचा हे काही जणांचे उदिष्ट दिसते, अशा अप्रत्यक्ष शब्दात त्यांनी टीका केली.


त्यांनी पुढे सांगितले की, गोपीचंद पडळकर (Jayant Patil on Gopichand Padalkar) यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीची कल्पना नाही, माहिती घेऊन बोलेन, पण आरक्षणाची मागणी प्रत्येक समाज करत असताना आता त्याबाबत सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. राज्य सरकारची आरक्षणाबाबतीतची भूमिका गुलदस्त्यात आहे. सरकारने याबाबतीतची भूमिका स्पष्ट करावी. 


मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. 


ते पुढे म्हणाले की, सरकारमध्ये असणारे वेगवेगळे मंत्री वेगळी भूमिका वेळोवेळी सांगत आहेत. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा देण्याचा सल्ला देत आहे, मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. मंत्रिमंडळातील अनेक जण वेगवेगळ्या दिशेने तोंड करून बोलत आहेत. त्यामुळे सरकारने एकमुखाने आरक्षणाच्याबाबतीत आपली ठाम भूमिका काय, पुढे कोणती कृती सरकार करणार हे सांगावं. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य देखील आता राजीनामा देत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. 


इंदापुरात घडलेल्या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये


दरम्यान, कालच्या घटनेववर गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे. इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा प्रकार घडला. या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या