कोल्हापूर : ज्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिानीचे राजू शेट्टी विरुद्ध महायुतीचे धैर्यशील माने अशी थेट लढत होईल, असे काही दिवसांपूर्वीच वाटत होते. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चित्र पूर्णत: पालटून गेलं आहे. दुरंगी लढत म्हणता म्हणता आता थेट पंचरंगी लढत होत असल्याने आता हातकणंगलेचा निकाल अतिशय रोमांचक वळणावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये काय होणार याचे उत्तर 4 जून रोजी निकालामध्येच मिळणार आहे. 


एकाच तालुक्यातील तीन उमेदवार रिंगणात


आज इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये तब्बल पाच उमेदवार रिंगणात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून डीसी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा पंचरंगी झाली आहे. एकाच तालुक्यातील तीन उमेदवार रिंगणात आल्याने आता त्याचा नेमका फटका कोणाला बसणार? याची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. सत्यजित पाटील एकमेव शाहुवाडी तालुक्यातील आहेत, तर प्रकाश आवाडे, डीसी पाटील आणि  धैर्यशील माने हातकणंगले तालुक्यातील आहेत. राजू शेट्टी हे शिरोळ तालुक्यातील आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघातील मतांची विभागणी कशी होणार? याकडे सुद्धा लक्ष आहे. 


जयंत पाटलांकडून अचानक गाठीभेटी 


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारासाठी काल (11 एप्रिल) इचरकरंजी दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये त्यांनी तीन आमदारांच्या भेटीगाठी केल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. या भेटीगाठीत नेमकी कोणती चर्चा केली याबाबत मात्र तपशील समजू शकलेला नाही. 


जयंत पाटील यांनी इचलकरंजी दौऱ्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा असली, तरी आज प्रकाश आवाडे यांनी उमदेवारीची केलेली घोषणा पाहता राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. जयंत पाटलांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ते पाहता निश्चितच ही भेट औपचारिकपणे नव्हती, असं बोलण्याइतपत वाव आहे.


राजेंद्र पाटील यड्रावकरांना भेटले  


जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सुद्धा भेट घेतली. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे गटाला साथ दिली असली, तरी त्यानंतर मात्र ते नाराजच असल्याची चर्चा आहे. त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. 2019 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतिक पाटील सुद्धा सोबत होते. त्यांनी सत्यजित पाटील सरुडकरांसाठी शब्द टाकल्याची चर्चा आहे. 


विनय कोरेंची सुद्धा भेट घेतली?


जयंत पाटलांनी या दोन्ही भेटीगाठी करतानाच आमदार विनय कोरे यांची सुद्धा भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत पूर्ण माहिती मिळाली नसली, तरी ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.  विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार महायुतीच्या जवळ असले, तरी उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात आहेत. त्यांनी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही. जयंत पाटलांची भेट होण्यापूर्वी विनय कोरे प्रकाश आवाडे यांना भेटले होते. त्यानंतर आवाडे यांनी राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेतली होती. 


जयंत पाटलांनी दोन मतदारसंघात एकाचवेळी डाव टाकल्याची चर्चा 


जयंत पाटील यांनी हातकणंगले आणि सांगली मतदारसंघांमध्ये पडद्यामागून बऱ्याच खेळी केल्याचे बोलले जात आहे. सांगलीमध्ये ज्या पद्धतीने वाद पेटला आहे त्यामागे सुद्धा जयंत पाटलांची खेळी असल्याचे बोलले जात असतानाच हातकणंगलेमध्ये सुद्धा त्यांचीच खेळी असल्याचा आरोप शेट्टी समर्थकांमध्ये होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या