कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur Loksabha) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असणार? याचा खल अजूनही सुरूच आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारीचा दावा केला असला, तरी भाजपकडून सुरू असलेल्या चाचपणीमुळे पुन्हा एकदा संशयाचे वातावरण तयार झालं आहे. हीच स्थिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्येही कायम असून तिथं सुद्धा भाजपने दावा केला आहे, त्यामुळे कोल्हापुरातील दोन्ही जागेवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही? याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. 


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा मीच उमेदवार असेल


या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटांच्या खासदारांची मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. या बैठकीनंतर कोल्हापूरमध्ये परतल्यावर संजय मंडलिक यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेले 13 खासदार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा मीच उमेदवार असेल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. माध्यमांमध्ये येत असल्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ते यावेळी म्हणाले. जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत पक्षातील इच्छुक प्रयत्न करतील, पण उमेदवार मीच असल्याचे ते म्हणाले. 


मी पहिला खेळाडू, असा मान मुख्यमंत्र्यांनी दिला


संजय मंडलिक म्हणाले की, शिंदेंना  पाठिंबा देणारा मी 12 वा खासदार होतो. त्यानंतर 13 व्या खासदाराने पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी उमेदवारीची ग्वाही दिली होती. आजही त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मी पाठिंबा देणारा 12 वा असलो, तरी निश्चितच 12 वा खेळाडू नाही. मी पहिला खेळाडू आहे, असा मान मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे मी उमेदवारीसाठी निश्चित आश्वस्त आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या