Chandrakant Patil in Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मात्र, अमित शहांसोबत निकटचे संबंध असूनही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मात्र कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंद्रकात पाटील आज कोल्हापूर मुलांमध्ये रमले. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, महिला सक्षमीकरणासाठी मुलींना दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुलींना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन दर्जेदार शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यावर राज्य सरकारकडून भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, सायकलमुळे शाळेत जाण्याची सोय झाल्याबद्दल उपस्थित विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना आरबीएल बँकेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत (उमीद 1000 अंतर्गत) 101 सायकली आणि शालेय वस्तूंच्या किटचे वाटप चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला.
ते म्हणाले की, "बँकेच्या वतीने विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्याने ग्रामीण भागात लांबच्या अंतरावरुन शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींची निश्चितच सोय होईल." हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून मुलगी जन्मल्यानंतर आर्थिक ठेव, 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटी बसेसमधून मोफत प्रवास, महिलांना एसटी बसमध्ये निम्म्या भाड्यामध्ये प्रवास, उज्ज्वला गॅस योजना आदी विविध योजनांच्या माध्यमातून महिला व बालक, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय तसेच मराठा समाजातील तरुण तरुणींसह विविध घटकांचा विकास साधला जात आहे. तथापि, बँकांसह अन्य विविध प्रकारच्या संस्थांनी सामाजिक कार्यासाठी तसेच समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रकांतदादांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असतानाच चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिक नव्हते असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली. यानंतर अमित शाह सुद्धा त्यांच्या वक्तव्याने नाराज असल्याची चर्चा आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य टाळायला हवं होतं, असं म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या