Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांनाही वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 16 बंधाऱ्यांवर पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही  15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने ओसरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील, अशी चिन्हे आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये निम्म्य्याहून अधिक पाणीसाठा झाला असला, तरी ती पूर्णत: भरलेली नाही. पाटबंधारे विभागाकडून धरणातून पाण्याचे विसर्ग करण्याचे नियोजन सुयोग्य झाल्याने यंदा अजूनपर्यंत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. पंचगंगा नदी पुन्हा पात्राकडे गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुट, तर धोका पातळी 43 फुट आहे. मात्र, जुलैच्या पावसाने आजअखेर,पंचगंगेची पातळी इशारा पातळीवर पोहोचलेली नाही. काल दिवसभरात पंचगंगेची पातळी 4 फुटांनी कमी झाली होती. 


पाऊस थांबल्याने पिकांना जीवदान 


जून महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात  येत होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावत सर्वांनाच दिलासा दिला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येता येता टळले. मात्र, सलग होत असलेल्या पावसाने आलेली पिके पुन्हा पाणी तुंबल्याने हातून जाण्याची भीती होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाची पूर्णत: विश्रांती असल्याने पिकांना एकप्रकार जीवदान मिळाले असून शेतीकामांनाही वेग आला आहे. त्यामुळे भाताची रोप लावणीनेही जोर पकडला असून ती आता अंतिम टप्प्यात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या