Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील (Kolhapur News) शेळेवाडीतील स्वामी विवेकानंद संस्थेच्या विद्यालंकार शाळेमध्ये नववी आणि दहावीच्या वर्गातील मुलींना शिक्षकानं पॉर्न फिल्म (Porn Film)  दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोपी इंग्रजी विषयाच्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली. मंगळवारी (31 जानेवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिनाभरापूर्वी झालेला हा प्रकार सोमवारी समुपदेशन करताना गीता हसूरकर यांना पीडित मुलींनी धाडसाने माहिती दिल्यानंतर उघडकीस आला होता. 


शेळीवाडीतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन विकृत कृत्य करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी (वय 52, मुळगाव सोळांकूर, रा. फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) या शिक्षकाला शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भोपाल कोले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 


मुख्याध्यापक तसेच गावच्या सरपंचावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश


मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी माजगाव आणि शेळेवाडीच्या सात पीडित विद्यार्थिनींनी संगणक कक्षामध्ये गैरकृत्य केल्याबद्दल फिर्याद दाखल केली. दरम्यान, या प्रकरणानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शेळीवाडीतील धक्कादायक प्रकारानंतर संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली असून शाळेचे मुख्याध्यापक तसेच गावच्या सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


समुपदेशन करताना प्रकार उघडकीस 


शाळेतील 15 ते 16 वयोगटातील सात मुलींसोबत महिन्यांपूर्वी धक्कादायक कृत्य झाल्याची माहिती ग्रामस्थांना लागली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेकडे तक्रार केल्यानंतर बागडीची तत्काळ बदली करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामस्थांना या विषयावर पडदा पडल्याचे वाटत होते. तथापि, सोमवारी समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या समुपदेशक गीता हसुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन बोलते केले, तेव्हा शोषण झालेल्या मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. 


मुलींनी दाखवलेल्या धाडसी वृत्तीमुळे प्रकरण उघडकीस आले. मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपी शिक्षक विजयकुमार बागडीला अटक करण्यात आली. दरम्यान, शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या