Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) कृतज्ञता पर्वानिमित्त 6 मे  ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कृतज्ञता पर्वात आयोजित सर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करुया, शाहू मिलमध्ये एकाच ठिकाणी आयोजित सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजर्षी शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांनी देह ठेवला होता. यावर्षी या घटनेला 101 वर्ष पूर्ण होत आहेत.


महाराजांनी दूरदृष्टीने निर्माण केलेले कोल्हापूर हे आपल्या देशासाठी सर्वांगीण विकासाचे मापदंड ठरले आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी पथदर्शी ठरले. महाराजांच्या या विचार आणि कार्याला उजाळा देण्यासाठी मागील वर्षीपासून कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याला उजाळा देण्यासाठी या स्मृती शताब्दी वर्षपूर्ती निमित्त येत्या 6 मे स्मृती दिनापासून ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिलमध्ये 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023' साजरे करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी दिली. 


100 सेकंद श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण जिल्हा स्तब्ध राहणार


या उपक्रमांपैकी महत्वाचा कार्यक्रम दिनांक 6 मे 2023 रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या 101 व्या पुण्यतिथी दिवशी सकाळी 9.30 वाजता समाधी स्थळावर पुष्पांजली वाहून, सकाळी 10 वाजता 100 सेकंद श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण जिल्हा स्तब्ध राहणार आहे. त्यानंतर शाहू मिलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी महोत्सव आयोजित केला आहे.


यामध्ये गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तु, घोंगडी, जान, उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने, पुस्तके, दुग्ध उत्पादने, खाद्य पदार्थ यांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. खाद्य महोत्सव आणि तांदूळ, मिरची, गूळ व वन उत्पादने आणि विशेष म्हणजे आंबा महोत्सव आयोजित केला आहे. यावर्षीचा आंबा महोत्सव आठ दिवस राहणार आहे. औद्योगिक विकास दर्शवणारे दालन असणार आहे. या दालनाच्या माध्यमातून विविध उद्योगांना त्यांच्या उत्पादित वस्तूंचे, प्रदर्शन, विक्री व ब्रँडिंग येथून करता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी रोज हस्तकलेचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या