Kolhapur Crime : सोन्याचे दागिने पॉलिश बहाण्याने महिलांची फसवणूक करणारी (Kolhapur News) सहा परप्रांतीय आरोपींची टोळी सापळा रचून जेरबंद करण्यात आली. या टोळीकडून 210 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व इतर साहित्यासह 13 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने फसवणूक केल्यानंतर फिर्यादी अश्विनी आनंत आरेकर यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अटकेतील सहा आरोपी कागल ते मुरगूड रोडवर पाटबंधारे कार्यालयासमोर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. सचेनकुमार योगेंद्र साह (वय 38, रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल (सध्या रा. कागल), बौआ राजू बडई (वय 25, रा. परमपार्क, ता. सोरबजार, जि. सारसा (सध्या रा. कागल), कुंदनकुमार जगदेव साह (वय 28, रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल, धीरजकुमार परमानंद साह (वय 31, रा. जमुनिया, ता.परवत्ता, जि. भागलपूर, भावेश परमानंद गुप्ता (वय 35, रा.गोविंदपूर, ता.महेशखुंट, जि.खगडिया) आणि आर्यन अजय गुप्ता (वय19, रा. जमुनिया, ता. परवत्ता, जि. भागलपूर) अशी त्यांची नावे असून सर्व आरोपी बिहारमधील आहेत.
अटक केलेल्या टोळीकडून चोरीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोने पॉलिशसाठी लागणारे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल आढळल्या. ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता इतर दोन साथीदारांनी राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद असलेला गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच हा मुद्देमाल विक्रीसाठी या टोळीकडे दिला होता. पाॅलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करताना अटकेतील सर्व आरोपी मदतीसाठी थोड्या अंतरावर थांबून होते.
पाॅलिशच्या बहाण्याने दागिने लंपास
दरम्यान, फिर्यादी अश्विनी आनंत आरेकर (रा. वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांना 20 जानेवारी रोजी सोने पॉलिश करून देतो, असे सांगून अटकेतील परप्रांतीय टोळीने पायातील एक चांदीचे जोडवे पॉलिश करून स्वच्छ करून दिले. त्यानंतर गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करून देतो असे सांगून सांगितले. मात्र, त्यांनी अदलाबदल करून सोन्याचे मणीमंगळसुत्र घेवून पळून जावून त्यांची फसवणूक केली होती. यानंतर राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, तत्कालिन पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच पोलिस अंमलदार रणजित पाटील, सुरेश पाटील, असिफ कलायगार, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित पाटील, रफिक आवळकर तसेच सायबर पोलिस ठाणेकडील पोलिस अंमलदार सचिन बेंडखळे व सुरेश राठोड यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या