Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे वर्षाच्या सुरुवातीपासून लागलेला ईडीचा ससेमीरा कायम आहे. 21 दिवसांपूर्वी झालेल्या ईडीच्या छापेमारीनंतर आज पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच  गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली आहे.


दरम्यान, या तीन ठिकाणच्या तपशील समोर आला असला, तरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवर छापेमारी केल्याची चर्चा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप करत वर्षाच्या सुरुवातीला ट्विट करताना त्यांना यावर्षी हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीने कोल्हापूरमध्ये छापेमारी केली. पुण्यामध्येही  छापेमारी केली होती. मात्र, 21 दिवसांपूर्वी झालेल्या छापेमारीचा कोणताही तपशील आतापर्यंत ईडीने सादर केलेला नाही. तोपर्यंत आता पुन्हा एकदा नव्याने छापेमारी केली आहे. 


अप्पासाहेब नलवडे कारखान्यावरून सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले आहेत. या कंपनीशी निगडीत असलेल्या ब्रिक्स कंपनीच्या कार्यालयावरही 11 जानेवारी छापेमारी करण्यात आली होती. मात्र, कारखान्याकडे कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने गोडसाखरकडे मोर्चा वळवला आहे. हरळीमधील शाखेत ईडीचे पथक इतरांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आला होता.  


हसन मुश्रीफ यांनी सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. मागील कारवाईनंतर त्यांनी कट्टर राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्यावर आरोप केला होतात. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी आरोप फेटावून लावले होते. या गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी झालेल्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता, मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. छापेमारीमागे कोलकता कनेक्शन असल्याचे पण म्हटले जात आहे. बंद पडलेल्या कंपन्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून ते नंतर कारखान्यासाठी वळण्यात आल्याचा आरोप ईडीमधील सूत्रांनी केला आहे. दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या