Aadhaar Card : राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर 10 वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार कार्ड तयार होऊन 10 वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अपडेट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.


आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करा  


आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांनी आपल्या नजिकच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अद्ययावत करुन घ्यावे.


जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या नियंत्रणांर्तगत आधार कार्ड अपडेटच्या कामकाजासाठी कँपचे नियोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक www.kolhapur.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई- मेल) 50 रुपये तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी (हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन) 100 रुपये शुल्क निर्धारित केले आहे. परंतु, नागरिकांनी स्वत: myAadhaar पोर्टल (myaadhaar.uidai.gov.in) वरुन 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीत आधार कार्डवरील माहिती अद्ययावत केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यानंतर 25 रु. शुल्क आकारले जाईल. 


ज्या नागरिकांचे आधार तयार होऊन दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी तात्काळ आपले आधार अपडेट करुन सहकार्य करावे. नागरिकांनी आपले आधार रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि भविष्यकाळातील गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या