Dhairyasheel Mane : बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हानच त्यांनी यावेळी  दिले. 


1 शिवसैनिक 100 जणांना भारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला, तरी आम्ही निवासस्थानी घुसणार असल्याचे ते म्हणाले. गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है, उद्धव ठाकरेंशी बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणाही यावेळी  देण्यात आल्या. 


माने गटाची दोनवेळा गद्दारी 


यावेळी बोलताना मुरलीधर जाधव  म्हणाले की, माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली.  पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नसल्याचे ते म्हणाले. 


धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती 


मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्नांची सरबत्ती शिवसैनिकांनी केली आहे. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा  गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घराती भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशी विचारणा शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केली आहे.


मोर्चाला विरोध करू नका, खासदार मानेंकडून आवाहन 


बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियातून केलं आहे. धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडताना शांततेचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये.