Panhala Fort Landslide : ऐतिहासिक पन्हाळगडच्या दुरावस्थेवरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. किल्ल्याची पडझड होत असतानाही पुरातत्त्व विभाग कोणतीच हालचाल होत नसल्याने शिवभक्तांमध्ये चांगलाच संताप उफाळून आला आहे. 


संभाजी ब्रिगेडकडून आज किल्ले पन्हाळगडावर पन्हाळगडच्या दुरावस्थेवरून गडावरून खाली प्रतिकात्मक टेबल व खुर्च्या खाली फेकून कडेलोट आंदोलन करण्यात आले. ढासळलेले बुरुज दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडकडून कडेलोट आंदोलन करण्यात आलं. जर पन्हाळगडावरील ढासळलेल्या बुरुजांची डागडूजी तातडीने झाली नाही, तर अधिकाऱ्याच गडावरून खाली फेकून देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर विशाळगडावरही बुरुज ढासळला आहे. त्यामुळे दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. विशाळगडचा बुरुज ढासळल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानकडून ढासळलेले दगड रणटेकडीवर सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. 


संततधार पावसाने पन्हाळा किल्ल्याच्या चार दरवाजाला लागून असलेल्या ऐतिहासिक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. मागीलवर्षीही याच जागेजवळ भिंतीचा काही भाग कोसळला होता, मात्र निधीअभावी दुरुस्तीची कामे झाली नाहीत. किल्ल्याची तटबंदीचे काही बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत.  या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून लक्ष देण्याची विनंती केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या