कोल्हापूर : शासकीय कार्यालयात अनेकदा अधिकारी, कर्मचारी किंवा शाळेत शिक्षक महाशय मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी सोशल मीडियावर तसे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यांना जाबही विचारण्यात आला, कारवाई करण्यात आली आहे. आता, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आमदारांच्या पाहणी दौऱ्यातच चक्क तलाठी महोदय दारुच्या नशेत आढळून आल्याने पुन्हा एकदा प्रशासनाची इभ्रत वेशीवर टांगली गेली आहे. यावेळी, इचलकरंजी येथील तलाठी (Talathi) महाशयांना आमदारांनी खडे बोल सुनावत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जुना सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत निदर्शनास आले. आमदार आवाडे यांनी त्याची गांभिर्याने दखल घेत सहाय्यक तलाठ्याचे वैद्यकिय तपासणी करुन तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना वरिष्ठांना केल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. शहरातील जुना सांगली नाका रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या भागातील रुंदीकरणात अडथळा होणार्‍या गोष्टी हटविण्यात आल्या असल्या तरी रुंदीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. या संदर्भात शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन रुंदीकरण संदर्भात माहिती जाणून घेतली. त्यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी आनंदा डवरी हे मद्यप्राशन करुन असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते. ते मद्यधुंद अवस्थेतच कामावर असल्याचे समजल्यानंतर आमदार आवाडे यांनी दूरध्वनीवरुन थेट वरिष्ठांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली.

दरम्यान , आमदारांच्या दौऱ्या भरदिवसा सहायक तलाठी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने प्रशासनातील अनेकांची झोप उडाली असून आमदारांच्या सूचनेनुसार आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

MNS Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार? मतदानावर बहिष्कारासह तीन-चार पर्यायांवर चर्चा, दोन दिवसात निर्णय होणार