Kolhapur News : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गो-हत्या बंदीबाबत कडक कायदे करावेत, या मागणीसाठी कोल्हापुरात उद्या रविवारी सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा (Hindu protest march against Love Jihad on 1 January in Kolhapur) काढण्यात येणार आहे. बिंदू चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. हा मोर्चा बिंदू चौकातून प्रारंभ झाल्यानंतर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे मोर्चा भवानी मंडप कमानीबाहेर येईल व तेथे मोर्चाची सांगता होईल. सर्व समाजाने मोर्चावेळी दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवून मोर्चात सहभाग होण्याचे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेकडून करण्यात आले आहे. 


जनआक्रोश मोर्चा, वाहतूक मार्गात बदल


जनआक्रोश मोर्चासाठी कोल्हापुरात पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, 100 फुटी रस्ता खानविलकर पेट्रोल पंपाजवळ, शहाजी महाविद्यालयात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चावेळी अंबाबाई मंदिर परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी असेल. मोर्चाचा मार्ग वगळून इतर रस्त्यावरून भाविक, पर्यटकांनी चालत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जावे, असे आवाहन वाहतूक नित्रंयण शाखाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.


लव्ह जिहाद निमित्त आंदोलन, कर्नाटक सरकारच्या समर्थनासाठीच


दरम्यान, उद्याच्या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चे खोटे कारण पुढे करत भाजपच्या चिथावणीने मोर्चे काढले जात असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात किंवा देशात कुठेही लव्ह जिहादचा कार्यक्रम राबवला जात नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी तेथील भाजपने गेली काही वर्षे मुस्लिमविरोधी कारवाया सुरू ठेवल्या आहेत. त्याचबरोबर अलीकडे कर्नाटकातील त्या पक्षाने आणि त्याच्या सरकारने महाराष्ट्र विरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. 


कोल्हापुरात नुकताच सीमावासियांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा काढला. त्या पार्श्वभूमीवर केवळ भाजपच्या कर्नाटकातील धर्मांध प्रचाराला बळ देत मराठी जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तथाकथित लव्ह जिहादचे खोटे भूत उभे करण्यात येत आहे. त्यासाठी काढण्यात आलेले मोर्चे कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी वातावरण निर्माण करू पाहत आहेत. भाजपच्या या महाराष्ट्रद्रोही कारवायांना कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने थारा देऊ नये, शाहू महाराजांच्या सर्व धर्मांना समतेची वागणूक देणाऱ्या सहिष्णू परंपरेचे रक्षण करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनतेला करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या