Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जय्यत तयारी केली जात आहे. रस्सा मंडळे, हाॅटेल सुद्धा चांगलीच संज्ज झाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी देशी मद्य सेवनाचे 26 हजार 700, तर विदेशी मद्य सेवनाचे 60 हजार 600 परवाने देण्यात आलेत. 5 हजार 115 आजीवन मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वितरित करण्यात आले आहेत. थर्टी फर्स्टसाठी दारू पिणाऱ्यांकडे परवाना आवश्यक आहे. अन्यथा कारवाई करण्यासाठी शहर आणि परिसरात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये नाकेबंदी सुरू केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बिअर बार आणि परमीट रुम, देशी-विदेशी विक्री केंद्रावर दारू पिण्याचा एकदिवसीय परवाना उपलब्ध केला आहे. त्यांच्याकडून दारु पिणाऱ्यांकडे या परवान्यांची विचारणा होणार आहे. हे परवाने दुकानांत उपलब्ध आहेत. तसेच नेहमी अकरा-साडेअकरापर्यत खुले असणारे परमीटरूम बिअर बार 31 डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत खुले राहणार आहेत. तर देशी दारु विक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत असतील अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातून देण्यात आली.
जल्लोषासाठी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. गोव्यातून थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी दारू तस्करी होण्याची शक्यता असल्यामुळे सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. कागल चेकपोस्ट, चंदगडमध्ये तिलारी, आजरा रोडवरील गौसे तिट्टा, गगनबावडा येथे करूळ घाटात, राधानगरी येथे अभयारण्याजवळ फेजिवडे परिसरात आणि शाहूवाडीत आंबा घाटात पथके तैनात असतील. प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य या वन परिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, वनक्षेत्रात आणि धरणाच्या ठिकाणी होणाऱ्या सेलिब्रेशनमुळे वन्यजीवांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वन अभयारण्ये आणि परिसरातील पर्यटन स्थळे 30 डिसेंबरपासून तीन दिवस बंद ठेवली जातील. 2 जानेवारीपासून ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली होतील. (kolhapur police)
इतर महत्वाच्या बातम्या