New Year Celebration : आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. आपण सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी (New Year Celebration) सज्ज झालो आहोत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांनी (Devotees) मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे. राज्यातील पंढरपूर (Pandharpur), शिर्डी (Shirdi), अक्कलकोट (Akkalkot), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.


नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांकडे भाविकांनी धाव घेतली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.



New Year Celebration : सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांकडे भक्तांची धाव 


पंढरपूरमध्ये हजारो भाविक दाखल 


सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे. आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिराला रात्री फुलांची आकर्षक आरास केली जाणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटात गेल्यानंतर सरते वर्ष निर्बंधमुक्त आणि चांगले गेल्यानं येणारं नवीन वर्ष संकटमुक्त जावं हीच भावना घेऊन देशभरातील पर्यटक आणि भाविक विठ्ठल चरणी आले आहेत.


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज 


नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी देखील सज्ज झाली आहे. आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानं यांनी घेतला आहे. नवीन वर्षानिमित्त साई समाधी मंदिर, चावडी, द्वारकामाई मंदिर या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


हिंदू मंदिरे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न; पंढरपूर मंदिरासाठी बडवे समाजाचा पुढाकार, सुब्रमण्यम स्वामी सर्वोच्च न्यायालयात देणार लढा