कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचे आगार मानल्या जाणाऱ्या पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात 2.78 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचावर पोहोचली


कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाला जोर नसला तरी, उघडझा सुरू आहे. मात्र, धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मोसमात पहिल्यांदाच शिरोळमधील पंचांग नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. 


जिल्ह्यात काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे


हातकणंगले- 11.5 मिमी, शिरोळ -3.3 मिमी, पन्हाळा- 63.7 मिमी, शाहुवाडी- 74.4 मिमी, राधानगरी- 31.8 मिमी, गगनबावडा- 48.4 मिमी, करवीर- 18.1 मिमी, कागल- 23.4 मिमी, गडहिंग्लज- 23.1 मिमी, भुदरगड- 35.7 मिमी, आजरा- 34.5 मिमी, चंदगड- 58 मिमी, असा एकूण 32.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.


जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा


राधानगरी 2.78 टीएमसी, तुळशी 1.40 टीएमसी, वारणा 12.74 टीएमसी, दूधगंगा 5.10 टीएमसी, कासारी 0.98 टीएमसी, कडवी 1.33 टीएमसी, कुंभी 0.93 टीएमसी, पाटगाव 1.72 टीएमसी, चिकोत्रा 0.51 टीएमसी, चित्री 0.63 टीएमसी, जंगमहट्टी 0.54 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.65 टीएमसी, आंबेआहोळ 0.90 टीएमसी, सर्फनाला 0.08 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.12 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.


चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जास्त पाणीसाठा 


दरम्यान, सांगली जिल्ह्यातील चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा एक टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. धरणात एकूण 11.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी जूनअखेर एकूण पाणीसाठा 10.88 टीएमसी होता. गतवर्षी पेक्षा 368 मिलिमीटर पाऊस जादा पडला आहे. धरणातून 675 क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने 4589 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोली धरण परिसरात 1 जून पासून 516 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या