Kolhapur News : 'जागरुक पालक सदृढ बालक' अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी सोमवार 6 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.  

Continues below advertisement


अभियानाची माहिती देताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) म्हणाले की, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील (Kolhapur News) शून्य ते अठरा वर्षापर्यंतची सर्व बालके, किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करा. गरजू आजारी बालकांवर औषधोपचार करुन शस्त्रक्रिया व प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधाही पुरवा, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करा, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करा. पथक निहाय त्या त्या कार्यक्षेत्रानुसार तपासणी होण्यासाठी काटेकोर नियोजन करा. प्रत्येक तपासणी पथकाकडून एका दिवसात किमान 150 विद्यार्थ्यांची तपासणी होईल, यापद्धतीने नियोजन करा.


प्रत्येक पालक आणि बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


त्यांनी पुढे सांगितले की, "शासकीय, निमशासकीय शाळा, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, अंध, मुक, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणीचे पथकाने नियोजन करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील (Kolhapur News) बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसह ऊस तोड, वीट भट्टी आदी काम करणाऱ्या कामगारांच्या शाळाबाह्य बालकांचीही तपासणी होईल, यासाठी चोख नियोजन करा. पुरेसा औषधसाठा ठेवा. या योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक पालक व बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करा."


सविस्तर तपासणी करुन औषधोपचार केले जाणार


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे म्हणाले, "या अभियानात जिल्ह्यातील बालकांची सविस्तर तपासणी करुन घेण्यात येणार आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी सह अन्य आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहेत. याबरोबरच किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक व मानसिक आजार शोधून त्यांनाही आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येतील."


या अभियानांतर्गत प्रत्येक आजारी बालकांवर वैद्यकीय उपचार, औषधोपचार तसेच नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, बालगृहे, बाल सुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाची वसतिगृहे, अनाथ आश्रम आदी ठिकाणी बालकांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुबेकर यांनी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या