Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर ईडी कार्यालयात चौकशीसाठी मंगळवारी (14 मार्च) हजर झाले. त्यांना आजही (15 मार्च) चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तसेच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी वकिलांच्या माध्यमातून रिट पिटीशन दाखल केली होती. या याचिकेवर मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.


अर्जावर तातडीने सुनावणी करावी 


दरम्यान, मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्यानंतर सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने या अर्जावर तातडीने सुनावणी पूर्ण करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाकडून तहकूब करण्यात आली आहे.


न्यायालयाचा दिलासा, मुश्रीफ काय म्हणाले?


"न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मी तातडीने ईडी कार्यालयात चौकशीसाठी तातडीने दाखल झालो. त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे देण्यासाठी मी आलो आहे. ईडीकडून जेव्हा बोलावणं येईल तेव्हा मी हजर होणार आहे," असं हसन मुश्रीफ म्हणाले होते. 


ईडीकडून न्यायालयात काय युक्तिवाद झाला?


"ईडी सध्या करत असलेल्या तपासात हसन मुश्रीफ यांना आरोपी केलेलं नाही. त्यामुळे तूर्तास त्यांच्या अटकेचा प्रश्न नाही. सध्या तपास अधिकारी प्राथमिक तपास करत आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. जर त्यांना अटकेची भीती असेल, तर त्यांनीही रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असा युक्तिवाद ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी केला. 


मुश्रीफांच्या वकिलांकडून काय युक्तिवाद?


राज्यात बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे 10 ते 12 वर्ष जुन्या प्रकरणामध्ये तपास सुरु करण्यात आला आहे. ज्या कंपनीबाबत तपास सुरु आहे त्याच्याशी मुश्रीफांचा कोणताही थेट संबंध नाही. ते या कंपनीत कुठल्याही पदावर नाहीत. या प्रकरणी हसन मुश्रीफांना कधीही अटकेची शक्यता असल्याने तातडीने अटकेपासून संरक्षण देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद मुश्रीफांचे वकील आभात पोंडा यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या