Kisan Sabha Long March : किसान सभेच्या मोर्चात नवा ट्विस्ट आला आहे. मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी घेतली आहे. सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे दाखवून देणार आहे, असं गावित म्हणाले.


शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, आंदोलक शेतकऱ्यांची उद्विग्नता


किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची आज सरकारसोबत बैठक होणार होती. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारने रद्द केली. आज आंदोलकांनी बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मंत्र्यांनी यावे, असे गावित म्हणाले. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारने प्राधान्य दिलं, मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, असं म्हणत, आंदोलक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


लाल वादळाची मुंबईच्या दिशेने आगेकूच


शेतकऱ्यांच्या लालभडक वादळाने नाशिक तालुक्याची वेस ओलांडून मुंबईच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेला मोर्चा आता इगतपुरीत येऊन धडकला आहे. या मोर्चात अनेक शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध इतकंच काय तर लहान मुलांचे चिमुकले पायी रस्ता तुडवत मुंबईकडे निघाले आहेत. हातात लाल बावटा घेतल्यामुळे या वादळाने रस्तेच्या रस्ते लालभडक झाले आहेत.  


आज आम्ही रस्त्यावर उतरणार : आमदार विनोद निकोले 


आमचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी येणार होते. पण अचानक ही बैठक रद्द झाली. कालच बैठक होणे अपेक्षित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या संदर्भात आवाज उठवला होता. काल आम्ही सभागृहात आवाज उठवला आज रस्त्यावर उतरणार आहे. अधिवेशन सुरू आहे तरीही मी मोर्चात सहभागी होणार आहे. समाधान झाले नाही तर पालघर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करून सरकारचा निषेध  करणार असल्याचे आमदार विनोद निकोले म्हणाले. 


पाच वर्षानंतर नाशिक ते मुंबई लाँग मार्च


पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लाँग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी महिला भगिनी पायपीट करत नाशिकहून मुंबईला पोहोचले होते. कुणाचे पाय रक्तबंबाळ झाले होते तर कुणाचे पाय सुजलेले होते. एवढं करुन काहीही उपयोग झाला का? असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पुन्हा त्याच मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मजूर आणि आदिवासीबांधव पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरुन उन्हाचा चटका सहन करत मुंबईला निघाले आहेत.