Hasan Mushrif: जून 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित वळण घेतल्यानतंर पुन्हा एकदा वर्षभरानंतर राज्याच्या राजकारणात खिचडी तयार झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरुंग लावल्यानंतर आता अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा पॅटर्न राबवताना भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. अजित पवार यांनीही अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीवर दावा केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जे नाट्य शिवसेनेत घडले, तेच राष्ट्रवादीत घडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पहाटेच्या शपथविधीचे चर्वितचर्वण सुरु असतानाच दुपारचा  शपथविधी पार पडला. अजित पवारांसह  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामधील छगन भुजबळ जेलची हवा खाऊन आले आहेत, तर हसन मुश्रीफ यांच्या अटकेची टांगती तलवार असून त्यांना 11जुलैपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. 


हसन मुश्रीफांच्या 'त्या' पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झळकले!


दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रम पत्रिकेवरून कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या एक आठवडाभरापूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती.कार्यक्रम पत्रिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो अपेक्षित असताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झळकल्याने चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी कार्यक्रम पत्रिकेवरून खुलासा करताना गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. तसेच ईडी चौकशीचा आणि या जाहिरातीचा काहीही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 


मात्र, त्या प्रकरणानंतर आता थेट मुश्रीफांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने मनात होते, तेच ओठावर शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून आलं होतं का? अशीही चर्चा आहे. किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफांवरुन होत असलेल्या विनोदावरूनही सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. मुश्रीफ थेट भाजपसोबत आल्याने आता गेल्या काही दिवसांपासून थेट आमदार असल्यासारखाच वावर असलेले कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचीच पुरती अडचण करून टाकली आहे. 


मुश्रीफांची ईडीकडून सुटका झाली? 


ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांनी ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी वाचताना दोन नंबरला हसन मुश्रीफ यांचा उल्लेख केला.


ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. ईडीकडून करण्यात येत असलेले सर्व दावे हसन मुश्रीफ यांच्याकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमीरा सुरु आहे.  मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात 108 तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे. 


किरीट सोमय्या आता काय  करणार?


हसन मुश्रीफांविरोधात सर्वाधिक मोर्चा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडला होता. इतकंच नाही, तर त्यांनी केलेल्या कोल्हापूर दौऱ्यावरुन राजकीय राडाही झाला होता. गेल्या सहा महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जावरून मुश्रीफ यांचा पाय खोलात आहे. त्यामुळे हसन मुश्रीफांविरोधात सातत्याने किरीट सोमय्या ट्विट करून आरोप करत आहेत आणि उत्तर द्या म्हणत आले आहेत. त्यामुळे आता किरीट सोमय्या नेहमीप्रमाणे तलवार म्यान करणार का? असा प्रश्न आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या