Kolhpur Crime: गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांनी आदेश दिला. एक दिवसाने वाढवलेल्या पोलीस कोठडीचा कालावधी शनिवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. 


शुभदा पाटील आणि राहुल राऊत फरार झाल्यानंतर सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली. ही कोठडी संपल्यामुळे शनिवारी दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. राठोड यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. नीता चव्हाण यांनी तर संशयितांतर्फे अॅड. संजय मगदूम यांनी बाजू मांडली. 


राहुल राहुतकडून मोबाईल फॉरमॅट 


दरम्यान, संतोष शिंदे प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. एपीआय राहुल राऊतने त्याच्याकडील जुने दोन मोबाईल फॉरमॅट केले आहेत. त्यानंतर त्याने नवा मोबाईल सोलापुरात घेऊन त्याठिकाणीच ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावरुन पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी  मिळावी, अशी मागणी अॅड. चव्हाण यांनी केली. तर पोलिसांना तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याचा युक्तिवाद अॅड. मगदूम यांनी केला. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. राठोड यांनी संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 


नवा मोबाईल सोलापुरात


राहुल राऊतचा नवा मोबाईल सोलापुरात असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. हा मोबाईल आशिष नावाच्या व्यक्तीकडे दिल्याचे त्याने कबूल केले आहे. मात्र, हा मोबाईल अद्याप गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात मिळालेला नाही. तो ताब्यात मिळाल्यानंतर त्याच्या आयडीवरुन डाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरीकडे, संतोष शिंदे यांच्याही मोबाईलमध्ये चार अननोन नंबर आढळले आहेत. यामधील दोन व्हॉट्सअॅपचे कॉल आहेत. संशयितांनीच हे नंबर वापरले आहेत का? याचाही पोलीस तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या