Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ सुरुच आहे. त्यांच्याविरोधात आणखी 67 शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आहे. याप्रकरणी 2 एप्रिल रोजी आणखी 67 शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तक्रार केली.
यापूर्वी, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात समभाग खरेदी आणि सभासद नोंदणीच्या आमिषाने मुश्रीफ यांनी फसवणूक केल्याची तक्रार 25 शेतकऱ्यांनी केली होती. त्यापूर्वी यापूर्वी याच प्रकरणात 13 शेतकऱ्यांची सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मुरगूड पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारदारांचे जबाब घेऊन पुढील चौकशी केली जात आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मुश्रीफ यांनी 40 हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन सुमारे 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर या प्रकरणी विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांच्यासह 13 शेतकऱ्यांनी 26 फेब्रुवारी रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापुरातील गुन्ह्यात 24 एप्रिलपर्यंत दिलासा
हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत त्याला मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणी येईपर्यंत आता तक्रारदार शेतकऱ्यांची संख्या 108 वर गेली आहे. तत्पूर्वी, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वीकारली आहेत.
अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय उद्या होणार
दरम्यान, ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय विशेष न्यायालयाने राखून ठेवला आहे. 5 एप्रिल रोजी याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. विशेष न्यायालयाने ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या