Hasan Mushrif on KDCC : गेल्या दोन तीन महिन्यांपासून अनेक अफवा पसरवल्या जात असतानाही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (KDCC Bank) इतिहासात चालू वर्षात सर्वाधिक नफा झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ केडीसीसी बँकेचे अध्यक्ष आहेत. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सभासदांचे आभार मानले. मुश्रीफ यांनी आर्थिक वर्षाची समाप्ती 31 मार्चला झाल्याने आज बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इतिहासात सर्वात जास्त नफा यावर्षी झाला आहे. त्यांनी सांगितले की, ठेवीदारांना विनंती ठेवी कोणत्याही बँकेत ठेवा, पण वाढीव पैशाच्या हव्यासापोटी फसवणूक करू घेऊ नका. चेन मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवू नका. ईडीचा छापा पडल्यानंतर देखील ठेवीदारांनी विश्वास ठेवला. दोन ते अडीच महिने अनेक अफवा पसरल्या होत्या, पण ठेवीदार, बँकेचे कर्मचारी यांनी विश्वास दाखवला यासाठी त्याचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले. 


हसन मुश्रीफ प्रकरणात ईडीकडून बँकेची चौकशी 


दरम्यान, हसन मुश्रीफ प्रकरणात आतापर्यंत ईडीकडून तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. बँकेच्या पाच अधिकाऱ्यांसह तीन माजी संचालकांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. ब्रिक्स कंपनीच्या कर्जपुरवठा संदर्भात ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीन माजी संचालकांची सुद्धा मुंबईत चौकशी झाली  आहे. तत्कालीन संचालक सर्जेराव पाटील-पेरिडकर, विलास गाताडे आणि आसिफ फरास यांची चौकशी झाली आहे.


मुश्रीफ यांना 5 एप्रिलपर्यंत दिलासा


ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील निर्णय विशेष न्यायालयाने राखून ठेवला आहे. 5 एप्रिल रोजी याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. तसेच, तातडीने सुनावणी घेण्यासही सूचना केली होती. विशेष न्यायालयाने ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला.


व्यावसायिक भागीदार गायकवाड यांनाही समन्स 


दुसरीकडे, मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार ब्रिक्स इंडिया कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांनाही समन्स बजावले आहे. या कंपनीकडून संताजी घोरपडे उभारण्यात आला होता, तर गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालवण्यास घेतला होता. आतापर्यंत या सर्व प्रकरणात ईडीकडून तीनदा छापेमारी करण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :