Hasan Mushrif vs Samarjeetsinh Ghatge: सासूसाठी वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली, अशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. रविवारी मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच राजे भूमिगत झाले होते. नेहमीच संपर्कात असणारे रविवार दुपारपासून त्यांचा कोणताच संपर्क होत नव्हता. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. फडणवीस यांनी समरजित यांना विधानसभेची तयारी सुरुच ठेवण्याचा शब्द झाली आहे. उभय नेत्यांमध्ये मंत्रालयात चर्चा झाली. त्यामुळे समरजित घाटगे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या उलटसूलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे प्रसिद्धीपत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान राजेंच्या नाराजीची चर्चा रंगल्यानंतर त्यांच्याकडे अन्य पक्षांकडूनही चाचपणी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


देवेंद्र फडणवीस यांनी राजेंना मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असला, तरी तुम्ही त्रास करून घेण्याची गरज नाही. कोणी आल्यास परतावून लावण्याची क्षमता आपल्याकडे आहे, असा विश्वास त्यांनी दिला. त्याचबरोबर सध्या सुरू असलेली विधानसभेची तयारी सुरूच ठेवा असा शब्द त्यांनी दिला. यावेळी राजेंसोबत शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष बाळ घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, कारखान्याचे संचालक युवराज पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, सुनील मगदूम यांच्यासह भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. 


कागलमध्ये राजकारणाचा पट बदलला


मागील विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफांविरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर राजे यांनी लगेचच पुन्हा नव्याने तयारी सुरु केली होती. कागल तालुक्याने जिल्ह्याच्या राजकारणाने स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ  यांचा राजकीय संघर्ष पाहिला अगदी त्याच पद्धतीने समरजित आणि मुश्रीफ गटाचा संघर्ष कागलच्या राजकारणात सुरु आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तीनवेळा छापेमारी केल्यानंतर मुश्रीफ यांनी सर्वप्रथम राजेंना टार्गेट केले होते. तसेच त्यांच्याच इशाऱ्यावर ही कारवाई झाल्याचा त्यांचा रोख होता. गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही गटातील संघर्षाला धार आली आहे. मात्र, त्यांच्याच मांडीला मांडी लावायची वेळ आल्याने राजे बावचळून गेले आहेत. विधानसभेसाठी तयारी करून मुश्रीफांचा प्रचार करण्यास भाग पाडणार नाहीत ना? अशी धास्ती त्यांना आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या