Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तिरवडे ग्रामपंचायत (Kolhapur District Gram Panchayat Election) निवडणूक प्रचारामध्ये विना परवाना प्रचारसभेत मतदारांना व विरोधी उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव यांनी दिली. ग्रामपंचायत तिरवडे गावातील लोकनियुक्त सरपंचसाठी माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव निवडणूक रिंगणात आहेत. 


प्रचारासाठी मंगळवारी रात्री परवानगी न घेता बेकायदेशीरर शुभांगी जाधव यांच्या सांगणेवरुन विश्वजीत जाधव यांनी कुदरवाडी या ठिकाणी सभा घेतली. यावेळी मतदारांना व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना "मागच्या वेळी वाचलास" काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे "शुभांगीची सीट निवडून येणे गरजेचे आहे, जर शुभांगीचं काय झालं, तर इथं वाईट परिणाम होणार एवढच सांगतो" असे वक्तव्य केले.


विश्वजित जाधव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. सामाजिक शांतता भंग करण्याचे व कायदेशीर सुव्यवस्था बिघडवणेचे उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे.  मतदारांना धमकावून भिती दाखवून आचारसंहिता भंग केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात


दरम्यान, प्रचार एका बाजूने शिगेला पोहोचला असतानाच प्रतिस्पर्धी अंधश्रद्धेच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी सुद्धा चांगलेच प्रयत्न सुरु आहेत. गावगाड्यावर उतारा टाकण्यावर अजूनही विश्वास ठेवला जातो, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दारात, लिंबू, मिरच्या, काळ्या बावल्या गुलाल लावलेल्या दिसून येत आहेत. यातून काय साध्य होणार हा संशोधनाचा मुद्दा असला, तरी ज्यांच्या मनात अनामिक भीती यांना अधिकच भीतीच्या छायेत सोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  


भावनेच्या राजकारणाला जोर 


ग्रामपंचायतीचे राजकारण हे पूर्णत: स्थानिक मुद्यांवर आणि भावनिक होत असते. त्यामुळे परडीवर हात मारायला लावणे, शपथ घालणे, रानाला बांध लागून असेल, तर त्याची भीती घालणे, सेवा संस्था असेल, तर त्याची भीती घालणे, दूध संस्था असल्यास त्याची भीती घालणे, असे प्रकारही सर्रास घडून येतात. त्यामुळे  एक भावनेचा बाजार सर्वाधिक मांडला जातो.


इतर महत्वाच्या बातम्या