Ashok Chavan : कोल्हापूर आणि नांदेडचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड-कोल्हापूर विमानसेवा (Nanded Kolhapur flight service) सुरु करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना साकडे घातले आहे. तसेच चव्हाण यांनी नांदेड-मुंबई व मुंबई-कोल्हापूर ही विमानसेवा ट्रुजेटऐवजी इंडिगो किंवा एअर इंडियासारख्या कंपनीकडे सोपवण्याची मागणी शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड येथील विमानसेवेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत त्याकडे स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी नांदेड शहराला अनेकदा भेटी दिल्या असून, त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिल्याचेही नमूद केले. 


चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन देत नांदेडवरून मुंबईसह, हैद्राबाद, नवी दिल्ली, अमृतसर, चंदीगड, पुणे, शिर्डी, नागपूर व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली. दरम्यान, या भेटीनंतर शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिंदे यांनी म्हटले आहे की, देशाच्या नकाशावरील नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव आहे. येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन. 






दरम्यान, अशोक चव्हाण यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना नांदेडची विमानसेवा खंडीत झाल्याने प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबाबत अवगत केल्याचे म्हटले आहे. नांदेडहून ट्रुजेट या विमान कंपनीला नांदेड- मुंबई- कोल्हापूर विमानसेवेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या अक्षमतेमुळे ही विमानसेवा नियमित स्वरूपात सुरू नव्हती. नांदेड व कोल्हापूर ही दोन्ही शहरे देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा आणि कोल्हापूर येथील अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरांची विमानसेवा सुरळीत असणे आवश्यक असल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 


Kolhapur Airport : कोल्हापूर -बंगळूर विमानसेवा 13 जानेवारीपासून


Kolhapur Airport : दरम्यान, कोल्हापूर-बंगळूर मार्गावर विमानसेवा 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनी (indigo airlines) या मार्गावर सेवा देणार आहे. आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे बंगळूरमधून हे विमान पुढे कोईमतूरला जाईल. त्यामुळे दक्षिणेकडे राज्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक शिक्षण आणि नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय मिळाला आहे. इंडिगो कंपनीकडून (indigo airlines) सध्या कोल्हापुरातून तिरुपती अहमदाबाद आणि हैदराबाद या मार्गावर विमानसेवा पुरविण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या