DIWALI 2022 : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा दिवाळी निर्बंधमुक्त साजरी होत असल्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. खरेदीसाठी रस्त्यांवर तोबा गर्दी  दिसून येत आहे. दिवाळी सण तिखट गोड करणाऱ्या तयार फराळाची सुद्धा बाजारात वाढत चालल्याचे चित्र आहे. तयार फराळाच्या किंमती अधिक असल्या, तरी अनेकजण वेळेअभावी अधिक भाव मोजून खरेदी करताना दिसून येत आहेत.


दिवाळी फराळातील चिवडा, शंकरपाळी, करंजी, चकली या लोकप्रिय ‘फराळ’ उत्पादनांची किरकोळ बाजारात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरातील अनेक स्वीट मार्ट्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने दिवाळीसाठी तयार फराळ आणि गोड पदार्थांनी सजलेली आहेत. 


स्वादिष्ट फराळ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे उत्पादनांच्या किंमती त्यानुसार वाढल्याचे तयार फराळ विकणाऱ्या गृहिणींचे मत आहे. कोरोना कालखंडापासून त्यामध्ये अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे फराळाच्या किंमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, मात्र ते पैसे खर्च करण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे.  काही गृहिणींनी फराळ बनवता येत नसल्याने थोडे जास्त पैसे देऊन बाजारातून खरेदी करण्याला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. 


कोल्हापूरमध्ये बाजारपेठ सजल्या 


दुसरीकडे तयार फराळाला मागणी वाढली असतानाच बाजारपेठ खरेदीसाठी फुलून गेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दिवाळीचा आनंद साजरा करता न आल्याने नागरिक यावेळी ती कसर भरून काढताना दिसत आहेत. बाजारपेठेत सर्वाधिक गॅझेट्ससह इलेक्ट्रॅानिस वस्तू खरेदी करण्याकडे ओढा आहे. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या आठभडाभरापासून गर्दीने रस्ते भरून गेले आहेत. आॅनलाईन खरेदीसोबत आॅफलाईन खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अनेक कंपन्यांकडून तसेच इलेक्ट्रॅानिक वस्तूंसाठी बँका तसेच फायनान्स कंपन्यांकडूनही चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. वाहन खरेदीला पसंती दिली जात आहे. 


शहरातील मुख्य मार्ग सुरु राहणार


दरम्यान, दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये शहरातील महाद्वार रोड, राजारामपूरी तसेच शहरातील काही मार्केटस् ठिकाणी दिपावली सणाचे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक या उत्सवाच्या कालावधीत सुरु रहाणार आहे. हे संपूर्ण मुख्य रस्ते बंद करण्यात येणार नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या