Kolhapur Municipal Corporation : दिपावली (DIWALI 2022) सणाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरु राहणार आहे. महाद्वार रोड, राजारामपूरी तसेच शहरातील काही मार्केटस् ठिकाणी दिपावली सणाचे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. यंदा निर्बंधमुक्त दिवाळी होत असल्याने बाजारपेठेमध्ये चांगलेच चैतन्य आहे. शहरातील बाजारपेठा गेल्या काही दिवसांपासून खरेदीसाठी गर्दीने फुलून गेल्या आहेत. बाजारपेठेत स्मार्टफोन, लॅपटाॅपसह इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंना मोठी मागणी आहे. 


दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी सणात हे संपूर्ण मुख्य रस्ते बंद करण्यात येणार नाहीत. या परिसरातील दुकानदार व्यवसायिक व फेरीवाले यांना महापालिका प्रशासनाकडून आखून दिलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्टयाचे आत व्यवसाय करावा लागणार आहे. यासाठी या रस्त्यांवर महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सणाच्या कालावधीत उपस्थित राहून सर्व फेरीवाले, दुकानदार व व्यवसाईक यांना नियमानुसार व्यवसाय करण्याचे नियोजन करतील. 


नवरात्र उत्सवाप्रमाणे शहरातील संपूर्ण रस्ते वाहतुकीस सुरु राहणार आहेत. सर्व दुकानदार व फेरीवाले यांनी त्यांना आखून दिलेल्या पट्ट्याच्या आत थांबून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेऊन आपला व्यवसाय करण्याचे आवाहन  महापालिकेनं केलं आहे. कोणीही व्यवसायिक रस्त्याचे मध्यभागी थांबणार नाही, जर कोणी फेरीवाले मध्यभागी व्यवसाय करताना आढळल्यास त्या फेरीवाल्याचे साहित्य जप्तीची कारवाई केली जाईल, याची सर्व व्यावसायिक, फेरीवाले यांनी नोंद घ्यावी, असे अतिक्रमण विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.


घरफाळा विशेष कॅम्पमध्ये 17 इमारतींना मालमत्ता कराची आकारणी


दरम्यान, कोल्हापूर मनपाच्या घरफाळा विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये 17 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. घरफाळा विभागाकडून सोमवारी विभागीय कार्यालय क्रं.2 शिवाजी मार्केट (घरफाळा ऑफिस) अंतर्गत नविन कर आकारणी करणेकरीता 2 अर्ज कर आकारणीसाठी सादर झाले. त्याप्रमाणे प्राप्त 2 अर्जांवर कागदपत्र मागणीबाबत जागेवर नोटीस देवून पुढील दोन दिवसात त्यांचे अर्ज निर्गत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


तसेच मागील आठवडयापर्यंत घरफाळा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण 17 अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांची पूर्तता करून घेवून त्या मिळकतींची कर आकारणी अंतिम करण्यात आली आहे. प्राप्त 19 प्रकरणांना 15/2 ची नोटीस लागू करून कर आकारणी अंतिम करण्यात आली आहे. या कॅम्पला उपायुक्त शिल्पा दरेकर व कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. तर कर अधिक्षक अशोक यादव यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित नागंरिकांच्या तक्रारींचे निवारण केले.


आज विभागीय कार्यालय क्र.3 राजारामपुरी (घरफाळा विभाग) येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, तरी नागरिकांनी या लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या