maharashtra politics : एकनाथ शिंदे आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेने एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांचा सकाळपासून कोणताही संपर्क होत नसतानाच आता जिल्ह्यातील पाच माजी आमदारांनी गोव्यात मुक्काम ठोकल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे सर्व माजी आमदार गोव्यात असल्याची माहिती माजी शिवसेना आमदार उल्हास पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. उल्हास पाटील यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजीत पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर यांनी गोव्यात मुक्काम ठोकला आहे. याचबरोबर सांगलीमधील अनिल बाबर, सातारमधून मंत्री शंभूराजे देसाई तसेच महेश शिंदे यांच्यासह 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील माजी शिवसेना आमदारांनी गोव्यात मुक्काम ठोकल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. हे सुद्धा एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असल्याची चर्चा रंगली आहे. 


एकनाथ शिंदेंशी बोलण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सुरतमध्ये  


दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक हे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सुरतला पोहोचले आहेत. त्यांनी सध्या सुरतमधील हाॅटेल मेरेडियनमध्ये तंबू ठोकला आहे. हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर 10 मिनिटे ताटखळत ठेवल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक यांना भेट मिळाली आहे. 


एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी


एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्टच संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत विकास फाटकही आहेत.


दरम्यान, शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे आता लक्ष आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या