Kolhapur News : बँकाकडून तसेच पीक विमा कंपन्यांकडून शेतीच्या कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणे हा प्रकार नवीन नसला, तरी आता कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचा कडेलोट होईल, असा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करुनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे. महादेव पाटील (वय वर्ष 45, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला, तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबीयांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. 


दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या कॅनरा बँकेत संपर्क साधला होता. बँक मॅनेजरकडे दोनवेळा मागणी करुनही कर्ज नाकारण्यात आले होते. त्यामुळे नैराश्यात गेल्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शेतकरी महादेव पाटील यांच्या मित्रांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडूनही बँक मॅनेजरला कर्जासाठी विनंती करण्यात आली होती, तरीही त्यांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे आपल्या मुलासाठी कोणी कर्ज दिलं नाही. त्यामुळे मुलाच्या भवितव्यावरुन तसेच मुलीचे लग्न न झाल्याने ते चिंतेत होते. या नैराश्यात त्यांच्या जुन्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 


दोन जिवलग मित्रांची एकाच वेळी गळफास घेत आत्महत्या


दरम्यान, चार दिवसांपूर्वीच हातकणंगले तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघा मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. तालुक्यातील पारगावमध्ये बिरदेव नगर वसाहतीमध्ये राहणारे विनायक पाटील आणि त्याचा मित्र बाबासाहेब मोरे यांनी एकाच झाडाला आत्महत्या केली.


दोघांनाही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने तणावात होते. आर्थिक चणचण आणि कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने नैराश्यातून 3 एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास पारगाव येथील वारणा तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामध्ये एका झाडाला दोघांनीही दुचाकीचा आधार घेत सोबत आणलेल्या दोरीने झाडाच्या एकाच फांदीला एकाचवेळी आत्महत्या करत जीवन संपवले. मित्र बाबासो मोरे हा विनायक यांना सहकार्य करत होता. 


इतर महत्वाच्या बातम्या