कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) विरोधात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एल्गार करण्यात आला. कोल्हापुरातील दसरा चौकातून ते जिल्हाधिकार्यालयावर विराट मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी मोर्चाला हजेरी लावत आपला आक्रोश व्यक्त केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तसेच जिल्ह्यातील महायुती, महाविकास आघाडी, तसेच शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांमधील नेत्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी अमोल येडके यांना निवेदन देताना शक्ती महामार्गाला स्थगिती नव्हे, तर त्याला स्थगितीच देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना येत असलेल्या नोटिसांवरून जिल्हाधिकारी अमोल येडगेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महामार्ग रद्द केल्यास विधानसभेला झटका देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 


शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अल्टिमेटम


या विराट मोर्चातून 12 जुलैपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. जर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात नाही आला, तर प्रसंगी हायवे अडवला जाईल, गावागावामध्ये आंदोलन केली जातील, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. यावेळी सर्वच नेत्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्दच करण्याची मागणी केली.  रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना पुन्हा नव्याने कशासाठी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कशासाठी घातला जात आहे? अशीच विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 


सतेज पाटील म्हणाले की, प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कोणीही मागणी केली नसताना कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी राज्य सरकार हा महामार्ग जनतेवर लादत आहे. स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवून घेत कंत्राटदारांचा खिसा भरण्याचा छुपा अजेंडा राबविणाऱ्या राज्य सरकारने हा महामार्ग 12 जुलैपर्यंत रद्द करावा. अन्यथा त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. 


सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची गंभीर परिस्थती निर्माण होणार 


यावेळी बोलताना स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. सदर महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जित महापुराची गंभीर परिस्थती निर्माण होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग या शक्तीपीठ महामार्गास कमीत कमी ३ किलोमीटर ते जास्तीत जास्त 22 किलोमीटर असा समांतर असून या रस्त्यामुळे जुना रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील टोलवसुली दुभागून सदर वाढीव टोलचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला सोसावे लागणार आहे. यामुळे शासनाने वरील सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.